शहरात दर दिवशी दोनशेवर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असताना प्रशासन मात्र ढिम्म आहे. अनलॉकनंतर वाढलेल्या संसर्गाने शहरवासीयांची झोपच उडाली आहे. दुसरीकडे १०० कोरोना पेशंट आढळून आल्यानंतर परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शहर तीन दिवस लॉक केले. औरंगाबादेत आकडा तीन हजारावर गेला तरी लॉक डाऊन बाबत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे तत्कालीन मनपा आयुक्त दीपक मुगळीकर आज चांगलेच चर्चेत होते. औरंगाबादलाही कठोर निर्णय घेणारा खमक्या अधिकारी हवा, अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आता कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. औरंगाबाद जिल्हा तर टॉप वर आहे. शहरात रुग्णांची संख्या ४ हजारावर गेली असून ग्रामीण भागातही संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉक डाऊन घेतला जाणार का ? अशी चर्चा रंगू लागली आहे. शहर अनलॉक केल्यानंतर बाजारात गर्दी वाढली. परिणामी दररोज १५० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसात तर ही संख्या प्रति दिवशी २०० वर जाऊन पोहोचली. दररोज शेकडोंच्या संख्येने रुग्ण आढळून येऊ लागल्याने लॉक डाऊन ची चर्चा सुरू झाली. मात्र राज्य सरकारच्या आदेशाशिवाय जिल्हाधिकारी लॉक डाऊन करू शकत नाही, असे बोलले गेले. मात्र परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हा समज खोटा ठरवला. परभणीत तातडीने तीन दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केले. मुगळीकरांच्या निर्णयाला औरंगाबादकरांनी दाद दिली आहे. शहरासह जिल्ह्यात लॉक डाऊन ची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र यासाठी कठोर निर्णय घेणारा खमक्या अधिकारी जिल्ह्याला हवा, असे बोलले जाते.